सामान्यातील असामान्य- सर आयझाक न्यूटन
उन्हाळ्यात रात्री अंगणात झोपायला किती मजा वाटते, नाही! हं, गच्चीवर देखील रात्री झोपणारे बरेच जण असतात. रात्री कधी
कधी अंथरुणावर पडल्या पडल्या आभाळाकडे सहज लक्ष जातं. तेवढ्यात एखादा तारा निखळतो. सर्रकन खाली जमिनीकडे खूप
जोरात झेपावतो. हे असं तारा निखळून खाली पडताना पहाणं, कुणी कुणी अशुभ मानतात. पण तसं काहीही नसतं बरं का. झाडाला
लागलेले आंबे देखील पिकले की जमिनीवर पडतात. ते असे सरळ जमिनीवरच का पडतात? कधी वर का नाही जात आभाळात?
नाहीतर कुठे लांब वाकडे तिकडे जाऊन नाही पडत? सरळ जमिनीकडेच का बरं ते झेपावतात?
आहे की नाही प्रश्न?
हाच प्रश्न आयझाक न्यूटनला देखील पडला होता. बागेत सहज फिरत असताना एका झाडाला लागलेलं सफरचंद त्याने जमिनीवर
सरळ खाली पडताना पाहिलं. हे असं का बरं घडलं? या प्रश्नाचं उत्तर त्याने शोधून काढलं. या जगात प्रत्येक वस्तू ही अशा प्रकारे
जमिनीकडे आकृष्ट होत असते, खेचली जात असते. हे त्याने व्यवस्थित प्रथम मांडून जगापुढे ठेवलं, हाच तो गुरुत्वाकर्षणाचा
सिध्दान्त! या सिध्दान्ताने न्यूटनला सर्वजण शास्त्रज्ञ म्हणून ओळखू लागले.
पांढऱ्या रंगात सातही रंग असतात हे देखील न्यूटननेच प्रथम सिद्ध करून दाखवलं. त्यासाठी त्याने एक चक्र तयार केलं. त्यावर
त्याने सातही रंग समानतेने रंगवले. मग ते चक्र त्याने जोराने फिरवलं, वेगाने फिरणाऱ्या त्या चक्रवरील सातही रंग एकरूप झाले. त्यांच्या
ठिकाणी फक्त पांढरा रंग दिसू लागला. सूर्याचा प्रकाशही पांढरा शुभ्र असतो, मात्र त्यात हे सात रंग … तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा,
निळा, पारवा अन जांभळा ….असतात न्यूटनने हे दाखवून दिलंय.न्यूटन हा विज्ञान अन गणिताचा गाढा विद्वान होता. गणितातही
त्याने शोध लावले. विज्ञान अन गणित या विषयाचं अध्यापनही त्याने केलं.
जगात शास्त्रज्ञ म्हणून मान्यता पावलेला आयझाक न्यूटन हा मात्र बालपणी अभ्यास करायला खळखळ करायचा. साहजिकच तो अगदी सामान्य विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा. वयाच्या बाराव्या वर्षी तो शाळेत गेला होता! अभ्यासाकडे कमी लक्ष, म्हणजे परीक्षेत गुण कमी, मग त्याचा वर्गात नंबर खाली असायचा. तुमच्या वर्गातही एखादा साधारण विद्यार्थी असेल पहा बरं तोही पुढे मोठेपणी
न्यूटनसारखा थोर शास्त्रज्ञ व्हायचा!