महाराष्ट्रातील पवित्र नद्यांमध्ये इंद्रायणी नदीचा समावेश होतो.
उगमस्थान : सह्याद्रीच्या डोंगररांगांत कुरवंडे या गावाजवळ इंद्रायणी नदी उगम पावते.
इंद्रायणी नदीच्या उपनद्या : कुंडलिका व आंद्रा या इंद्रायणी नदीच्या उपनद्या आहेत. याशिवाय
इतर काही छोट्या-छोट्या उपनद्या इंद्रायणीला येऊन मिळतात.
इंद्रायणी नदीचे खोरे : पुणे जिल्ह्यातील मावळ, राजगुरुनगर, हवेली हे तालुके इंद्रायणी
नदीच्या खोऱ्यात येतात.
इतर माहिती : आळंदी आणि देहू ही तीर्थक्षेत्रे इंद्रायणी नदीच्या काठी आहेत. उगमापासून
इंद्रायणी नदीचे पात्र अरुंद आणि उथळ आहे. प्रारंभी दक्षिणीवाहिनी असणारी ही नदी लगेच
दक्षिणपूर्वेकडे वळते. पुढे कुंडलिका आणि आंद्रा या नद्या इंद्रायणीला मिळतात. इंद्रायणी
पूर्वेकडे देहू जवळून वाहत पुढे आळंदी येथे येते. पुढे उत्तरेकडे वळून ती तुळापूर गावाजवळ भीमा
नदीला मिळते.

इंद्रायणी नदीची लांबी तसेच तिचे पाणलोट क्षेत्र बरेच लहान आहे. इंद्रायणी नदीला
पावसाळ्यात भरपूर पाणी असले, तरी उन्हाळ्यात मात्र पाण्याचे प्रमाण फारच कमी होते. या
नदीच्या खोऱ्यातील जमीन काळी, कसदार, सुपीक व गाळाची आहे. इंद्रायणी नदीकाठचा
प्रदेश अत्यंत सुपीक आहे. या नदीकाठी आळंदी व देहू ही पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत. इंद्रायणी
नदीच्या पाण्याचा उपयोग आसपासच्या शेतीसाठी केला जातो. इंद्रायणी नदीमुळे पुणे
जिल्ह्याचा मध्य भाग समृद्ध बनला आहे.