महाराष्ट्राच्या पश्चिम विभागातील प्रमुख नद्यांमध्ये कोयना नदीचा समावेश आहे.
उगमस्थान : सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर महाबळेश्वर येथे ४००० फूट उंचीवर
कोयना नदीचा उगम होतो.
कोयना नदीच्या उपनद्या : सोळशी, कांदाही, केरा, मोरणा आणि रांगा या कोयना नदीच्या
उपनद्या आहेत. या नद्या कोयना नदीला ठिकठिकाणी मिळतात.
कोयना नदीचे खोरे : कोयना नदीच्या खोऱ्यामध्ये सातारा इत्यादी जिल्हे येतात. तसेच
बामणोली डोंगर व वासोटा किल्ला यांच्या परिसरातील प्रदेश कोयनेच्या खोऱ्यात येतो.
इतर माहिती : महाबळेश्वर येथे उगम पावताना कोयना नदीचा आकार बराच रुंद आहे.
प्रारंभी दक्षिणेकडे वाहणारी ही नदी हेळवाक या गावाजवळ पूर्ववाहिनी बनते. पुढे कऱ्हाडजवळ
ती कृष्णा नदीला जाऊन मिळते. म्हणजे कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम कऱ्हाड जवळ
होतो. या संगमाला ‘प्रीतीसंगम’ असे म्हणतात. उगमापासून कृष्णा नदीला मिळेपर्यंत कोयना
नदीची लांबी सुमारे १०० किमी. आहे.
महाबळेश्वर येथे उगम पावणारी कोयना नदी जावळी आणि पाटण तालुक्यातून वाहत जाते.
या नदीवर हेळवाक येथे एक मोठे धरण बांधले आहे. या धरणाला ‘कोयना धरण’ असे म्हणतात.
या धरणातील प्रचंड जलाशयाला ‘शिवसागर’ असे नाव देण्यात आले आहे. या जलाशयातील
पाणी पश्चिमेकडे वळवून सह्याद्रीच्या बोगद्यातून चिपळूणजवळ पोफळी येथील जलविद्युत
केंद्रातील जमीनिवर सोडले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होते.
कोयना नदीवरील धरणामुळे महाराष्ट्राचे भाग्य उदयाला आले आहे. पोफळी येथील
जलविद्युत केंद्रातून निर्माण होणाऱ्या विजेवर मोठमोठे उद्योगधंदे चालतात. पश्चिम महाराष्ट्राला
या वीजप्रकल्पातून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे कोयनेला ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ असे
म्हणतात. या वीजप्रकल्पातून निर्माण होणारी वीज घरगुती वापराप्रमाणेच शेती, उद्योग,
कारखाने, व्यवसाय यासाठीही वापरली जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या भरभराटीत या वीजकेंद्राचा
सिंहाचा वाटा आहे.