ओळख शास्त्रज्ञांची- राईट बंधूंचं विमान

हे विमान फिरते अधांतरी – राईट बंधूंचं विमान


उंच आकाशात उडणाऱ्या विमानांविषयी किती कुतुहल वाटतं, नाही! कसं ते हवेत उडत असेल? त्यात माणसं कशी बसत असतील?
ते जमिनीवर कसं उतरत असेल? एक नाही अनेक प्रश्न. विमानाचा आवाज ऐकू आला की लहानमोठे सगळेजण आकाशाकडे वर पाहू
लागतात. विमानाचा शोध अशाच कुतुहलातून झालेला आहे. तो विसाव्या शतकाचा सुरूवातीचा काळ होता.

विल्बर अन ऑरविल हे राईट नावाचे दोघे भाऊ. त्यांच्या वडिलांनी एक खेळणं आणलं. ते त्यावेळी होते आठ दहा वर्षाचे. ते खेळणं मोठं मजेशीर होतं. रबराच्या मदतीने त्या खेळण्यातील पंखा फिरू लागायचा, ते खेळणं मग हवेत उडायचं, चांगलं दहा बारा फूट वर जायचं. पुन्हा खाली यायचं, रबराचा ताण संपला की पंखा बंद व्हायचा, खेळणं खाली जमिनीवर उतरायचं मात्र ते हवेत उडण्यापूर्वी आजच्या सारखं प्रथम जमिनीवर धावत जायचं नाही, तर सरळ वर जायचं हेलिकॉप्टर सारखं. या खेळण्याने राईट बंधूचं कुतुहल जागं झालं.
राईट बंधूना पतंगाचंही खूप वेड होतं. त्यांनी तयार केलेले पतंग हवेत उंच जायचे. सर्व लोकांना त्यांच्या पतंगाचं कौतुक वाटायचं. पतंग हवेत उडू शकतो मग आपणच का नाही हवेत वर जाऊ शकणार?

त्याच सुमारास जर्मनीत कुणी हवेत उडण्याचा प्रयत्न केला अन तो अपघाताने मेला. राईट बंधू या बातमीने काही घाबरले नाहीत. जे काही हवेत उडवायचं त्याला पक्ष्यासारखे पंख लावले तर? पक्षी नाही का हवेत उडत, असे अनेक विचार ते करत होते आणि विमान तयार करून उडवण्याचा प्रयोग हळूहळू आकार घेत होता. विमानाचे वेगवेगळे नमुने ते तयार करत राहिले. अख्नेरी एक विमान तयार झाले. त्यात एक यंत्र बसवले होते. एक माणूस त्यात बसण्याची क्षमता होती. एका भावाने यंत्र सुरू केलं. दुसरा त्यात बसला. विमान हवेत काही क्षण राहिलं. ते केवळ दहा फूट उंच गेलं. विमान सुरू होताच ते चाळीस फूट जमिनीवर धावलं मग वर झेपावलं. असं जमिनीवरून ते केवळ शंभर फूट उडालं, हा विमान उडवण्याचा पहिला प्रयोग, तो पहाण्यासाठी केवळ चार पांच लोक जमा झाले होते.

विमान जमिनीच्या वर हवेत तरंगलं या यशाने राईट बंधूंचा आत्मविश्वास वाढला. मग त्याच विमानाने ते दोनशे ते हजार फूट
पुढे हवेत तरंगत गेले. विमानाची कल्पना साकार झाली. राईट बंधूंचं हे पहिलं विमान आजही अमेरिकेत जतन करून ठेवलंय. विमानात हळूहळू संशोधनाद्वारे बदल केले गेले. युद्धात तर
विमानाचा वापर होऊ लागला. शत्रूच्या प्रदेशात सरळ घुसून बॉम्ब टाकून परत यायचं, जसं दूरवर विमानात जाता येतं तसंच वर उंच हवेत जाण्याचा शोध लागला, ताशी शेकडो किलोमिटर वेगाने विमाने जाऊ लागली. त्याचप्रमाणे शेकडो लोक एकाच वेळी विमानात बसून जाऊ लागली.

Leave a Comment