मरावे परी कीर्ती रूपे उरावे- आल्फ्रेड नोबेल
नोबेल पुरस्कार हा जगातील एक सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. कोण होता हा नोबेल? त्याच्या नावे हा पुरस्कार का दिला
जातो हे प्रश्न आपोआप उभे राहतात. नोबेल हा एक संशोधक होता. त्याने डायनामाइटचा शोध लावला. काय? डायनामाईट? हा तर
मोठा विध्वंसक स्फोटक पदार्थ! आतंकवाद्यांच्या बातमीत या पदार्थाचा उल्लेख येत असतो. असा स्फोटक, महाभयंकर पदार्थ
ज्याने शोधला त्याच्या नावे पुरस्कार! नोबेलचे जीवन म्हणजे एका प्रयत्नवादी माणसाची कथाच आहे म्हणा नं. स्वीडन, नॉर्वे, जर्मनी अशा कितीतरी देशात त्याने आपले कारखाने चालवले होते. स्वीडनमधील कारखान्यात नायट्रो ग्लिसरीन या स्फोटक पदार्थाचा वापर करताना प्रचंड स्फोट झाला. कारखाना नष्ट झाला, त्यात चार पाच माणसं मेली. सरकारने पुन्हा कारखाना उभारण्यास परवानगी नाकारली. जर्मनीत देखील त्याचा कारखाना असाच नष्ट झाला. नायट्रोग्लिसरीन या पदार्थावर ठिकठिकाणच्या सरकारांनी बंदी आणली, कारखाने बंद पडू लागले. कोणताही पदार्थ वाईट नसतो. मात्र त्याचा वापर कशासाठी केला जातो यावर त्याचा चांगला, वाईट परिणाम अवलंबून असतो.
स्फोटक पदार्थ विहिरींमधे सुरुंगासाठी वापरतात. त्यामुळे विहिरीतील कठिणातील कठीण दगड सहज फुटतात. त्यातूनच पाण्याचे झरे लागतात. पाणी हे तर आपलं जीवन. मग स्फोटक पदार्थांचा वापर चांगला की नाही? स्फोटकांना इकडून तिकडे नेताना डब्यांमधे ठेऊन
नेतात. रिकाम्या डब्यात खालीवर व बाजूला माती घालतात. त्यात मग नायट्रोग्लिसरीन ठेवतात. एकदा असंच नायट्रोग्लिसरीन मातीच्या
आवरणात ठेवलं, ते थोडं गळून मातीत मिसळलं. ती मातीदेखील मग स्फोटक बनली. पण त्याचा एक फार मोठा फायदा झाला. नायट्रोग्लिसरीन मिश्रित माती चांगलीच परिणामकारक मात्र कमी त्रासाची स्फोटक ठरली. स्फोटक म्हणूनही काम होऊ लागलं आणि
सुरक्षितताही वाढली. ही नायट्रोग्लिसरीनयुक्त माती म्हणजेच डायनामाइट.
नायट्रोग्लिसरीनमुळे होणारी हानी टळली. हा शोध खूप महत्त्वाचा ठरला. त्यामुळे नोबेलचे सर्व देशांतील कारखाने पूर्ववत सुरू झाले. त्याला भरमसाठ मिळकत होऊ लागली. या स्फोटकांमुळे इतका अमाप पैसा नोबेलनी मिळवला. त्याचा त्याने मृत्युपत्राद्वारे एक ट्रस्ट केला. सगळा पैसा बँकेमधे ठेवायचे, जे व्याज येईल त्या व्याजातून दरवर्षी महत्त्वाचं कार्य करणाऱ्यांना पुरस्कार द्यायचे. त्या पुरस्काराचं नाव नोबेल पुरस्कार!
२१ ऑक्टोबर १८३३ रोजी स्वीडनमधे जन्मलेला आल्फ्रेड नोबेल १० डिसेंबर १८९६ रोजी मरण पावला. तो अविवाहीत होता.
नोबेल मात्र त्याच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांनी अजरामर झाला.