ओळख शास्त्रज्ञांची-आर्किमिडिज

युरेका.

युरेका….
आर्किमिडिज

‘काय म्हणतोस, हा मुकुट पूर्णपणे सोन्याचा आहे?’ राजा मुकुटाकडे पहात म्हणाला मुकुट छान दिसत होता. चमकतही होता पण तो पूर्ण सोन्याचाच आहे की काय या विषयी हिरो राजा साशंक होता. आपल्या विजयाचं प्रतीक म्हणून तो एखाद्या देवतेसाठी सोन्याचा मुकुट तयार करून देत असे. मुकुट चांगला व्हावा म्हणून त्याने सोनाराला बोलावून खजिन्यातून सोनं काढून दिलं होतं. मात्र जो मुकुट त्याच्या समोर ठेवला होता तो पूर्णतया सोन्याचा नसावा, त्यात काही भेसळ केलीय असं त्याचं मत होतं.त्या मुकुटात किती सोनं आहे आणि किती भेसळ आहे हेशोधण्यासाठी मुकुटाला वितळवण्याचा एक मार्ग होता. पण मुकुट खूप छान दिसत होता म्हणून वितळवण्यास राजा तयार नव्हता.


आता काय करायचं ? राजाने आर्किमिडीजला बोलावणं पाठवलं. तो काळ होता इसवी सन पूर्व २५० वर्षाचा. त्याकाळी कुठे लागले होते
आजच्या सारखे शोध ! आर्किमिडीजने सोन्याचा तो मुकुट घेतला अन तो घरी आला. त्यातील सोनं तो न मोडता, न तोडता कसं शोधायचं? कसं मोजायचं? एक कठीण प्रश्न होता. त्याविषयी आर्किमिडिज सतत विचार करत होता. मात्र मार्ग काही सापडत नव्हता. एक दिवशी आंघोळीसाठी तो सार्वजनिक स्नानगृहात गेला. त्याठिकाणी होता पाण्याचा टब. तो पाहून त्यात बसण्याची इच्छा झाली आर्किमिडिजला. टब पाण्यानेगच्च भरलेला होता. तो जसा टबात जाऊन बसला तसं पाणी टबाच्या बाहेर पडलं. हे घडत असताना, आर्किमिडिजला राजाने सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर सुचलं. तो तसाच आनंदाने ‘युरेका .., युरेका’ ओरडत बाहेर पडला. युरेका युरेका म्हणजे सापडलं सापडलं … प्रश्नाचं उत्तर सापडलं.

प्रत्येक पदार्थ पाण्याच्या टबात/भांड्यात बुडवला असता त्याच्या वजनाइतकं पाणी बाहेर फेकतो हे ते उत्तर. दुसरे दिवशी
आर्किमिडिज दरबारात गेला आणि त्याने मुकुटाचं वजन दिलेल्या सोन्याच्या वजनापेक्षा कमी होतं हे राजाला दाखवून दिलं. हाच ते सापेक्ष घनत्वाचा सिध्दांत (Theory of Relative Density). आर्किमिडिजने आणखी बरेच शोध लावले. तो गणिताचा ही अभ्यासक होता. सामानाने गच्च भरलेलं जहाज लिव्हरच्या सहाय्याने आर्किमिडिजने किनाऱ्यावर एकट्याने ओढून आणलं होतं. हा चमत्कार आहे. आर्किमिडिजच्या जवळ काही दैवी शक्ती आहे असं पाहणारे म्हणाले! या बुध्दिमान शास्त्रज्ञाचा अंत मात्र करुण झाला.

रोमने सिसिलीवर स्वारी केली. रोम विजयी झाले. रोमन सैन्याने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. आर्किमिडीज मात्र काही भूमितीच्या आकृती जमिनीवर काढण्यात दंग होता. सैनिक आले, घोड्यांच्या टापांचा आवाज आला. तरीदेखिल त्याचं त्या आकृत्यांकडे एकाग्रतेने पहाणं चाललं होतं. सैनिक हत्यारं रोखून उभे राहिले ‘थांबा थांबा, या आकृत्या मोडू नका.’ असं तो म्हणताच एका सैनिकाने
आर्किमिडिजच्या छातीत हातातील भाला खुपसला. एका थोर शास्त्रज्ञाचा असा शेवट झाला.

आर्किमिडिजचा जन्म सिसिलीमधे इसवीसन २८७ पूर्वी झाला. त्याचा शेवट सिसिलीमधेच इसवी सन २१२ पूर्व झाला.

Leave a Comment